छत्तीसगडमधील गोशाळेत 27 गायींचा मृत्यू, भाजपा नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 01:57 PM2017-08-19T13:57:40+5:302017-08-19T14:03:40+5:30
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गोशाळेत तब्बल 27 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे गोशाळेचा संचालक हा भाजपाचे नेता असल्याची माहिती समोर आली आहे.
रायपूर, दि. 19 - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गोशाळेत तब्बल 27 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे गोशाळेचा संचालक हा भाजपाचे नेता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानं याप्रकरणाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. दुर्ग क्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक दीपांशु काबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायींच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालक हरीश वर्मा यांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील गौसेवा आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
गोशाळेत होती प्रचंड अस्वच्छता
काबरा यांनी सांगितले की, वर्माविरोधात छत्तीसगड कृषि-पशु संरक्षण कायदा 2004नुसार द्यानुसार कलम 4 व 6 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960नुसार 11 आणि भादवि कलम 409 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गौसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनुसार गोशाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. यामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराईदेखील पसरल्याची माहिती समोर आली आहे. दुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील धमधा विकासखंड अंतर्गत येणा-या राजपूर गावातील गोशाळेत गेल्या तीन दिवसांत 27 गायींचा मृत्यू झाला आहे.
अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 गायींच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पशु वैद्यांचं पथक घटनेच्या चौकशीसाठी पाठवण्यात आले होते. शिवाय, उपविभागीय दंडाधिका-यांनीही घटनास्थळाचा दौरा केला होता. त्यांनी सांगितले की, चौकशीनंतरच जनावरांच्या मृत्यूचं कारण समोर येईल. तर दुसरीकडे गोशाळेचे संचालक तसेच जामुल नगर पालिकेचे उपाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले की, 15 ऑगस्टच्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे गोशाळेतील 90 फूट लांब भिंत कोसळली होती. या दुर्घटनेत जखमी झाल्याने 27 गायींचा मृत्यू तीन दिवसांत मृत्यू झाला तर अन्य जखमी गायींवर सध्या उपचार सुरू आहेत.
उपासमारीमुळे गायींचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप
तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसनं गायींच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरत असा आरोप केला आहे की, उपासमारीमुळे गायींचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता आर.पी.सिंह असे म्हणालेत की, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारा व पाणी न मिळाल्याच्या कारणामुळे गायींचा मृत्यू झाला आहे. शिवाय या गोशाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतादेखील आहे, ज्यामुळे आतापर्यंत जवळपास 300 गायींचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस या मुद्यावरुन भाजपाला टार्गेट करत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.