नवी दिल्ली - देशभरात रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई, नागपूर यांसह अनेक ठिकाणी रेमेडीसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता दिल्लीत रेमडेसीवीर इंजेक्शन तब्बल 70 हजार रुपयांना विकणाऱ्या मेडीकल दुकानदारांस अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील मीरारोडमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल १६ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या योगेश संतोष पवार (२१) रा. वांद्रे व अस्मिता नारायण पवार (२१) रा . नालासोपारा ह्या दोघांना पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने अटक केली होती. विशेष म्हणजे हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून रेमडेसिविरची ५ इंजेक्शन जप्त करण्यात आली. तर, नागपूरमध्येही तब्बल 35 हजार रुपयांना इंजेक्शन विकणाऱ्यांवर ही कारवाई करुन त्यांना अटक केली होती.
दिल्लीतही इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यास 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले तीनही जण मेडीकल दुकानदार आहेत. सध्या, त्यांच्याकडून 7 इंजेक्शन जप्त करण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे 6 डोस द्यावे लागतात. त्यामुळे, या इंजेक्शनची मागणी वाढली असून सध्या तुटवडा जाणवत आहे. त्यातच, केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक इंजेक्शनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीही इंजेक्शनची करतरता भासत असल्याने याचा काळाबाजार होत आहे.