श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू असून गेल्या 24 तासांत चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा (Terrorists Neutralized) करण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात चकमक सुरू असून जम्मू-काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप(SOG), लष्कराचे 9 राष्ट्रीय रायफल्स जवान आणि सीआरपीएफचे जवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई सुरू केली आहे, तर श्रीनगरमधील (Srinagar) चकमक संपली आहे.
कुलगाममध्ये काल (11 नोव्हेंबर) सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. तत्पूर्वी संध्याकाळी जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. कुलगाममध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे हिजबुल कमांडर शिराज मौलवी आणि यावर भट्ट अशी आहेत.
गुरुवारी दुपारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चावलगाममध्ये सुरक्षा दलांना 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने लष्कराच्या 9 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या जवानांसोबत संयुक्त शोध मोहीम सुरू केली. यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, परंतु ते तयार झाले नाहीत. यावेळी प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला. यानंतर आज सकाळी सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.
श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याला केले ठारयाशिवाय, शोध मोहीम संपलेल्या श्रीनगरच्या बेमिना येथेही एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव अमीर रियाज असून तो मुजाहिदीन गजवतुल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. आमिर रियाझ हा पूर्वी लेथपोरा येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे.