Jammu-Kashmir : बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 09:55 AM2022-01-07T09:55:31+5:302022-01-07T10:13:18+5:30
Jammu-Kashmir : गुरुवारी रात्री बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Encounter at Zolwa Kralpora Chadooraof Budgam) झाली. या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचे आयजीपी काश्मीर यांनी सांगितले. तसेच, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची संघटना आणि त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळ्यांसह अनेक आपत्तिजनक साहित्य जप्त करण्यात आल्याचे आयजीपींनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी रात्री बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यातील जोलवा गावात शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली.
#UPDATE | All the three terrorists eliminated in Budgam enocunter affiliated with terror outfit JeM. So far one identified as Waseem of Srinagar City. Three AK 56 rifles recovered: IGP Kashmir
— ANI (@ANI) January 7, 2022
बुधवारी पुलवामामध्ये चकमक
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदगाम गावामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवादी असलेल्या ठिकाणाला घेरण्यात आले. दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. अखेर चकमकीमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
काश्मीरमधील पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्याजवळून दोन एम-4 कार्बाइन्स आणि एक एके-47 रायफल आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, नवीन वर्षाच्या पाचव्या दिवसांतील ही पाचवी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवानांनी 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.