थिरुवनंतपुरम : शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने खुला करूनही निदर्शने करून १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखणाऱ्यांविरुद्ध केरळ सरकारने सुरू केलेल्या अटकसत्रात अटक केलेल्यांची संख्या रविवारी ३,३४५ वर पोहोचली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत यासंदर्भात एकूण ५१७ गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत.शबरीमाला मंदिराच्या पुजारी कुटुंबातील सदस्य व मानवाधिकार कार्यकर्ते राहुल ईश्वर यांना रविवारी सकाळी कोचीमध्ये झालेली अटक ही या अटकसत्रातील ताजी अटक होती. मंदिर प्रवेशाच्या वादासंदर्भात गेल्या आठवड्यात कथित प्रक्षोभक विधाने केल्यावरून ईश्वर यांना अटक करण्यात आली.शनिवार दुपारपासून आयप्पा मंदिर असलेल्या पथनामथिट्टा, थिरुवनंतपुरम व एर्नाकुलम या जिल्ह्यांमध्ये ५०० हून अधिक व्यक्तींना अटक केली गेली. त्यापैकी फक्त १२२ जणांचा पोलिसांनी रिमांड घेतला. बाकीच्यांना जामिनावर सोडण्यात आले. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी या अटकसत्राचा तीव्र शब्दांत निषेध करून केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारने हिंदूंच्या श्रद्धेची पायमल्ली करून विस्तवाशी खेळू नये, असा इशारा दिला होता.
शबरीमालात महिलांचा प्रवेश रोखणारे ३,३४६ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 5:19 AM