कर्नाटकातील ४ जागा बिनविरोध? देवेगौडांसमोर भाजप देणार नाही उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:43 AM2020-06-09T05:43:26+5:302020-06-09T05:43:47+5:30
राज्यसभा निवडणूक : देवेगौडांसमोर भाजप देणार नाही उमेदवार
नवी दिल्ली : कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुका होत असून, भाजपने दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाकडे २७ अतिरिक्त मते असतानाही दोन जागांवरच निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
भाजपने इरन्ना कडाडी आणि अशोक गस्ती यांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे हे सहज निवडून येतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरातमधील आमदारांच्या फुटीनंतर आणखी फूट टाळण्यासाठी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांना काँग्रेसच्या अतिरिक्त आमदारांचे समर्थन देण्याचे निर्देश दिले. ८७ वर्षीय देवेगौडा पंतप्रधानपद सोडल्यानंतर प्रथमच राज्यसभेत पोहोचतील. मल्लिकार्जुन खरगेही प्रथमच राज्यसभेत जातील. देवेगौडा यांच्याकडे ३४ मतांचे समर्थन आहे.
गुजरातमधील काँग्रेस आमदार राजस्थानात
काँग्रेसच्या तीन आमदारांनी गत आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आपल्या आमदारांना राजस्थानात हलविण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसचे २० पेक्षा अधिक आमदार यापूर्वीच सिरोहीतील रिसॉर्टमध्ये दाखल झाले आहेत. १८२ सदस्यीय विधानसभेत काँगे्रसच्या सदस्यांची संख्या घटून ६५ झाली आहे. पक्षाने सर्व आमदारांना एकाच जागी माऊंट अबूजवळ रिसॉर्टमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला.
मणिपूर : त्या आमदारांना विधानसभेत नो एंट्री
काँग्रेसचा हात सोडून भाजपसोबत गेलेल्या सात आमदारांना मणिपूर उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या आमदारांना विधानसभेत प्रवेश मिळणार नाही. तसा आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीआधी भाजपला धक्का बसला आहे. मणिपूरमधील एकमेव जागेसाठी निवडणूक होत आहे.