सतना : मध्य प्रदेशातील सतना येथे सोमवारी एक मोठी दुर्घटना टळली. मैहर टेकडीवरील मां शारदादेवी मंदिरात दर्शनासाठी गेलेले सुमारे २८ भाविक रोप-वेच्या ट्रॉलीवरून प्रवास करत असताना हवेतच अडकले. अचानक मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने सात केबल कार किंवा ट्रॉली हवेतच लटकल्या होत्या. रोप-वे व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे भाविकांचा जीव कोंडीत सापडला होता. एका ट्रॉलीत चार जणांना बसण्याची परवानगी असते, त्यानुसार सात ट्रॉलीमध्ये २८ भाविक होते आणि हे सर्व तब्बल ४० मिनिटे हवेत लटकले होते.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही व्यवस्थापनाने रोप-वे सुरू ठेवला होता असे समजतेय. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असते. त्यावेळी रोप-वे बंद ठेवले जातात. ४० मिनिटांनंतर दामोदर रोप-वे व्यवस्थापनाने कशातरी हळूहळू ट्रॉली खाली आणल्या आणि भाविकांना सुरक्षित उतरवले. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. पण, घटनेमुळे सर्व भाविक प्रचंड घाबरले होते. रोप-वेचे काम थांबविण्याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याचा आरोप अडकलेल्या भाविकांनी रोप-वे व्यवस्थापनावर केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेने झारखंडमधील देवघर येथे नुकत्याच झालेल्या रोप-वे अपघाताची आठवण करून दिली. या अपघातात, दोन केबल-कार्सची समोरासमोर टक्कर होऊन पाच जणांचा मृत्यू, तर ३०हून अधिक जखमी झाले होते. पर्यटक सुमारे ४० तास अडकले होते. भारतीय हवाई दल, लष्कर आणि एनडीआरएफने हे बचाव कार्य केले होते.