दिल्ली विकास प्राधिकरणाने शनिवारी छतरपूर येथील एका बंगल्यावर मोठी कारवाई केली आहे. दिवंगत उद्योगपती पाँटी चड्ढा यांचा हा फॉर्महाऊस आहे. सुमारे १० एकरात पसरलेल्या या फार्म हाऊसचा मोठा भाग सरकारी जमिनीवर बांधण्यात आला आहे. याची किंमत सुमारे ४०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
कारवाईदरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे फार्महाऊस पाडण्याचे काम रविवारीही सुरू राहणार आहे. माजी मद्य व्यावसायिक पाँटी चढ्ढा उर्फ गुरदीप सिंह यांचे फार्महाऊस दक्षिण दिल्लीतील छतरपूर येथे सुमारे १० एकरावर बांधले होते. त्याचा मोठा भाग सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आला आहे.
त्यामुळे अतिक्रमण काढण्याच्या सूचना डीडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या. डीडीएने शुक्रवारपासून हे फार्महाऊस पाडण्याचे काम सुरू केले आणि शनिवारीही ते सुरूच राहिले. या फार्महाऊसवरून आतापर्यंत पाच एकरातील अतिक्रमण हटविण्यात आले. शनिवारी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
शनिवारी अंधार पडल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली असली तरी रविवारी बेकायदा बांधकाम पाडून सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात येणार असल्याचे डीडीएने सांगितले.