...अन् ५ वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या कुशीतच जीव सोडला; सरकारी अनास्थेचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:38 PM2020-06-08T12:38:06+5:302020-06-08T12:38:57+5:30
एनकेजे प्रेम नगरमधील रहिवासी ज्योती मुखर्जी या आईने आपल्या मुलाचा जीव गमावला आहे. दीड महिन्यापूर्वी तिच्या ५ वर्षाच्या मुलाला कुत्र्याने चावलं होतं.
कटनी – मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या एका गरीब आईला स्वत:च्या एकलुत्या एक मुलाच्या जीवाला मुकावं लागलं आहे. मुलाला वाचवण्याचे तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. रेबीज इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याने ५ वर्षाच्या मुलाचा जीव गेला आहे. मुलाच्या जाण्यामुळे आईला जबर धक्का बसला आहे.
एनकेजे प्रेम नगरमधील रहिवासी ज्योती मुखर्जी या आईने आपल्या मुलाचा जीव गमावला आहे. दीड महिन्यापूर्वी तिच्या ५ वर्षाच्या मुलाला कुत्र्याने चावलं होतं. त्यासाठी मुलाला रेबीज इंजेक्शनाचे डोस पूर्ण करणे आवश्यक होतं. पहिला डोस देण्यात आला मात्र दुसरा डोस देण्यासाठी ज्यावेळी ती सरकारी रुग्णालयात गेली तिथे ४ दिवस वाट पाहावी लागली. ५ व्या दिवशी डॉक्टरांकडून तिला इंजेक्शन उपलब्ध नसल्याचं सांगितले.
लॉकडाऊनमुळे रिक्षा घरीच पडून होती, कमाई बंद झाली होती, लॉकडाऊन काळात कसंबसं घर चालवत होती, या दरम्यान मुलाची तब्येत बिघडली, ३ दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी उपचारासाठी नकार दिला. विक्टोरिया रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मुलाला घेऊन आई विक्टोरिया रुग्णालयात पोहचली त्याठिकाणीही मुलाला बघण्यास डॉक्टरांनी असमर्थता दाखवली. वडिलांनी डॉक्टरांचे पाय पकडून मुलाच्या जीवासाठी विनवणी केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक तासाच्या उपचारानंतर त्याला पुन्हा घरी सोडण्यात आले. त्यावेळी एका नर्सने आईला सिहोरा येथील तांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला.
मात्र त्याठिकाणी आई-वडील घेऊन जात असताना वाटेतच मुलाने प्राण सोडला. मुलाच्या अचानक जाण्याने बिचाऱ्या आईच्या डोळ्यातून मुलाच्या आठवणीत अश्रू वाहत आहे. स्वत:ची गरिबी आणि सरकारकडून मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दोष ती देत आहे. या प्रकरणाची चौकशी केली असता गेल्या साडे चार महिन्यपासून जिल्ह्यात रेबीज इंजेक्शन नाही. सरकारने वर्षभर रेबीज इंजेक्शनची खरेदी केली नाही. रुग्णालयातील साठाही संपला आहे. त्याचा परिणाम एका आईला आपल्या मुलाचा जीव गमवावा लागला आहे असल्याचं दिसून आलं.