नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जितक्या रकमेची तरतूद केली होती त्यापैकी ५६ टक्के रक्कम प्रत्यक्षात केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठीच खर्च करण्यात आली, असे उघडकीस आले आहे. देशात दिवसेंदिवस घटत चाललेल्या महिलांच्या जन्मदरात वाढ व्हावी, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जावे आणि महिलाविषयीचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योजना २२ जानेवारी २0१५ रोजी जाहीर केली होती. महिला आणि बाल कल्याण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच मनुष्यबळ विकास या तीन मंत्रालयांकडून ही योजना देशभरात राबवली जात आहे.'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजनेसाठी केंद्र सरकारने ६४४ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी फक्त १५९ कोटी रुपये राज्यांना व काही जिल्ह्यांना पाठवण्यात आले. ही योजना देशातील ६४0 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशात मुलींचा जन्मदर अतिशय कमी असलेल्या १00 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. तर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी ६१ जिल्ह्यांना सामावून घेण्यात आले, असे सरकारने म्हटले आहे. >१९ टक्के रक्कम खर्च केलीच नाहीअत्यंत गाजावाजा करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ही योजना सुरु करताना यासाठी केंद्र सरकारने तरतूद केलेल्या निधीपैकी केवळ २५ टक्के रक्कमच विविध राज्ये आणि निवडलेल्या जिल्ह्यांच्या पातळीवर पाठवण्यात आली आहे. यातील १९ टक्के रक्कम तर खर्चच केली नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनीच दिली आहे.
केंद्राच्या ‘बेटी बचाओ’ योजनेचा ५0 टक्के खर्च केवळ प्रसिद्धीवरच!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:45 AM