पाटणा : पाटण्यातील एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणि पाटणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (पीएमसीएच) या दोन महत्त्वाच्या रुग्णालयांतील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी अशा सुमारे ५०० जणांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधा झाली आहे, असे या रुग्णालयांतील सूत्रांनी सांगितले. एम्समधील ३८४ कर्मचारी (यात डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरांचा समावेश आहे) कोरोनाच्या या धोकादायक दुसऱ्या लाटेत संक्रमित झाले, असे वैद्यकीय अधीक्षक सी. एम. सिंह म्हणाले.
पीएमसीएचचे अधीक्षक डॉ. इंदू शेख ठाकूर म्हणाले की, “आमचे १२५ पेक्षा जास्त कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यात ७० डॉक्टर्स आणि परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी मिळून ५५ जण आहेत.” पाटण्यात एम्स आणि पीएमसीएच तसेच सरकारी नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येतील कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आमच्या बाधित कर्मचाऱ्यांसाठी आम्ही विलगीकरणाची सोय केली आहे.