नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकासोबत घेण्यात येणार नाहीत यावरून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदींवर जोरदार टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेण्यात येणार आहेत. मात्र जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबत घेण्यात येणार नाही असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
मात्र, जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका न घेण्यावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाना साधला जात आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी टिविट् करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक न घेणे हे केंद्र सरकारचे अपयश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, हुर्रियत आणि दहशतवाद्यांसमोर शरणागती पत्करली आहे. 56 इंचाची छाती अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
ओमर अब्दुल्ला म्हणाले की, भारतविरोधी शक्तीसमोर पंतप्रधान मोदींने गुडघे टेकले हे लज्जास्पद आहे. बालकोट आणि उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थित हाताळल्याचा दावा केला गेला मात्र जम्मू काश्मीरमध्ये बिघडलेली परिस्थितीला जबाबदार मोदीच आहेत. 1996 नंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका वेळेत होत नाहीत.
दुसरीकडे पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनीही मोदी सरकारवर टीका केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त लोकसभा निवडणुका घेणे हे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. जनतेला सरकार निवडू न देणे हा लोकशाहीचा अपमान आहे. असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी मोदींवर केला.