नवी दिल्ली- भारतातील जवळपास ६० टक्के गर्भपात असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटलमधील उदासीन कारभार आणि जागरुकतेचा अभाव यांच्यामुळे भारतातील बहुतांश गर्भपात असुरक्षित असल्याची बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने गटमेकर या संस्थेसोबत जगभरात सर्वेक्षण केलं होतं. यामधून विविध देशांमधील गर्भपाताच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला होता. हॉस्पिटलमध्ये केला जाणारा गर्भपात किती सुरक्षित आहेत, याची पडताळणी या सर्वेक्षणाच्या माध्यमातू करण्यात आली. यामध्ये गर्भपातावर अनेक निर्बंध असलेल्या 62 देशांमधील असुरक्षित गर्भपातांचं प्रमाण ७५ टक्के असल्याचे आढळून आलं. तर गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिलेल्या 57 देशांमधील असुरक्षित गर्भपातांचे प्रमाण फक्त १३ टक्के इतके आहे. पण भारतातील परिस्थिती अतिशय वेगळी आणि चिंताजनक आहे.गर्भपाताला कायदेशीर मान्यता असूनही, देशातील असुरक्षित गर्भपातांचे प्रमाण खूप जास्त आहे.
गर्भपातासाठी योग्य प्रशिक्षित डॉक्टर, सहाय्यक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असं झाल्यास देशात सुरक्षित गर्भपातांचं प्रमाण वाढेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ‘सुरक्षित गर्भपातांचे प्रमाण वाढवायचं असेल तर धोरणात्मक बदल करुन त्याची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलून मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमपीटी) कायद्यात सुधारणा करण्याची गरड असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. कायद्यामध्ये योग्य ते बदल करून वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारला तर गर्भपात सुरक्षित होतील. नाहीतरी शहरी भागासह ग्रामीण दूर्गम भागातील महिलांना यापुढेही असुरक्षित गर्भपातांना सामोरं जावं लागेल, असं आयपास डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विनोज मॅनिंग यांनी म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१० ते २०१४ या काळात जगभरात ५ कोटी ५७ लाख गर्भपात झाले. यामधील ३ कोटी ६ लाख गर्भपात सुरक्षित होते. तर १ कोटी ७१ लाख गर्भपात कमी सुरक्षित होते. तर उरलेले इतर गर्भपात जास्त असुरक्षित होते.