रात्रीच्या अंधारात १८ किमी चालत पोहोचल्या ६५ मुली, वॉर्डनचं कृत्य ऐकून अधिकारीही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 09:20 PM2023-01-17T21:20:33+5:302023-01-17T21:21:12+5:30
Jharkhand News: एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या.
रांची - झारखंडमध्ये गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी कस्तुरबा गांधी विद्यालय सुरू केले जात आहे. या विद्यालयामध्ये सर्व सरकारी सुविधा उपलब्ध केल्या जातात. मात्र वॉर्डनची मनमानी आणि सरकारी स्तरावर शाळांची तपासणी होत नसल्याने मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचं उदाहरण त्यावेळी पाहायला मिळालं, जेव्हा ६५ मुली रात्रीच्या अंधारात पायी चालत जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या आणि मदतीसाठी विनवणी केली.
चाइबासा जिल्ह्यातील खुंटपानी कस्तुरबा विद्यालयामध्ये इंटरच्या विद्यार्थिनी वॉर्डनच्या मनमानीमुळे त्रस्त आहेत. येथे शिक्षण घेत असलेल्या एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या. एकाच वेळी ६५ मुलींना पाहून खळबळ उडाली. पाहता पाहता शिक्षण विभागातील कर्मचारी डीसी ऑफिसमध्ये पोहोचले.
त्यांनी विद्यार्थिनींची समजूत घालून त्यांना गाडीत बसवून पुन्हा शाळेत पोहोचवले. मात्र मुलींनी वॉर्डनबाबत जे काही सांगितले, त्याबाबत ऐकून सर्वांना धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा शिक्षण अधिक्षकांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली. तसेच डीसींनी या प्रकऱणाची तातडीने चौकशी करण्याची सूचना दिली.
या विद्यार्थिनींनी आरोप केला की, येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींकडून अभ्यासाच्या वेळातही इतर कामं करवून घेतली जातात. चांगला नाश्ता दिला जात नाही. तसेच पोटभर भोजनही दिलं जात नाही. जिल्हा शिक्षण अधीक्षक अभय कुमार शील यांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या. शाळेतील वॉर्डन मुलींचा मानसिक छळ करतात. तसेच तक्रार केल्यास वेगळी शिक्षा देतात, अशी तक्राव विद्यार्थिनींनी केली.
भीतीमुळे विद्यार्थिनी आई-वडिलांकडेही तक्राकर करत नाहीत. स्वच्छतेच्या नावाखाली त्यांच्याकडून दरमहा पाच रुपये उकळले जातात, तसेच ते न दिल्यास शिक्षा केली जाते. तसेच शिक्षा म्हणून शंभर ते दोनशे उठाबशा काढायला लावल्या जातात, अशी तक्रार विद्यार्थिनींनी केली.