65th National Film Awards : श्रीदेवी यांना 'मॉम' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:35 PM2018-04-13T12:35:25+5:302018-04-13T12:35:55+5:30
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना 'मॉम' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना 'मॉम' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं.
24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे दुबईमध्ये निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत त्या एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्यांचे निधन झाले. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या.
Sridevi awarded national award for best actor(female) for the movie 'MOM' #NationalFilmAwardspic.twitter.com/l4MIBB5I9y
— ANI (@ANI) April 13, 2018
(मराठमोळ्या 'मयत' लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार; कच्चा लिंबू सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट)
तर, 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुयश शिंदे दिग्दर्शित 'मयत' हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. राजेंद्र जंगलेची 'चंदेरीनामा' बेस्ट प्रमोशनल फिल्म म्हणून निवडण्यात आलीय, तर 'मृत्यूभोग' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. 'म्होरक्या' या मराठी चित्रपटाला स्पेशल मेन्शन पुरस्काराचा मान मिळालाय, तर 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला 'न्यूटन' हा सिनेमा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडण्यात आलाय.