लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची ६ वी यादी जाहीर; ५ नावांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 04:29 PM2024-03-25T16:29:40+5:302024-03-25T16:32:19+5:30
काँग्रेसने रविवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. राजस्थानमधून दोन आणि महाराष्ट्रातून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून हळू हळू उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. तर, देशभरातील राज्यात विविध प्रादेशिक पक्षही आपले उमेदवार घोषित करत आहेत. त्यात, काँग्रेसकडून आत्तापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या ५ याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रविवारी ५ वी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, चंद्रपूरमधील प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता, काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १२ उमेदवारांच्या नावांची काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसने रविवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. राजस्थानमधून दोन आणि महाराष्ट्रातून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राजस्थानमधील जयपूरमधून प्रताप सिंह खचरियावास यांना तिकीट देण्यात आले. तर, जयपूरपूर्वी सुनील शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. दरम्यान, दौसाचे आमदार मुरारी लाल मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांचे नाव निश्चित केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर चंद्रपूरमधून विजयी झाले होते. मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यात सुरेश धानोरकर यांचे निधन झाले. त्यामुळे, काँग्रेसने यंदा त्यांच्या पत्नीला लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे.
Congress releases the sixth list of candidates for the upcoming Lok Sabha elections. pic.twitter.com/rOump3WGto
— ANI (@ANI) March 25, 2024
काँग्रेसने २३ मार्च रोजी ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तर काँग्रेसने आतापर्यंत ५ याद्यांमधून १८६ उमेदवार जाहीर केले होते. आता, काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून राजस्थानमधील ४ आणि तामिळनाडूतील एका उमेदवाराच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. अजमेर, राजसमंद, भिलवाडा, कोटा आणि तामिळनाडूतून तिरुनेलव्हेली या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, अजमेरमधून रामचंद्र चौधरी तर कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे.