लखीमपूर खीरीमधील हिंसेप्रकरणी 7 जणांना अटक, आता STF करेल तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:18 PM2021-10-04T12:18:03+5:302021-10-04T12:18:36+5:30
Lakhimpur Khiri Violence: या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
लखीमपूर खीरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये रविवारी सायंकाळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांचे वाहन शेतकरी आंदोलनात घुसल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंत उत्तर प्रदेशातात वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता या प्रकरणाचा तपास एसटीएफ वर्ग करण्यात आलाय.
केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, एसटीएफ सोमवारी संध्याकाळपासूनच तपासाची सूत्रे हाती घेईल. दुसरीकडे, हिंसाचारानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन पोलिसांनी 24 जणांची ओळख पटवली आहे. यासोबतच पोलीसांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. यापूर्वी, या प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 लोकांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट आणि बंडखोरीसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
नुकसान भरपाईची मागणी
दरम्यान, या घटनेनंतर लखीमपूर जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक झाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतीय.
अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणानंतर लखीमपूर खीरी पासून लखनऊपर्यंत अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणही शिगेला पोहचले आहे. लखीमपूरच्या दिशेने जाणाऱ्या अखिलेश यादव, प्रियंका गांधी, शिवपाल यादव, राम गोपाल यादव, संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की त्यांना पीडितांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही.
राजकारण करू नका
दुसरीकडे, विरोधकांच्या वृत्तीवर कठोर भूमिका घेत योगी सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, विरोधी पक्ष या दुर्दैवी घटनेवर राजकारण करत आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. तपासाशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा दिली जाईल.