नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांतील मतदानाचा चौथा टप्पा संपला असून प्रचाराचा जोर अधिकच वाढला आहे. या निवडणुकीत देशाची सुरक्षा हा सर्वात मोठा मुद्दा बनवून राजकीय पक्षांचे राजकारण सुरू आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचे भांडवल भाजपा नेत्यांकडून प्रचारासाठी करण्यात येत आहेत. त्यातच, गॅलप वर्ल्ड पोल या जगप्रसिद्ध संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, रात्रीचे बाहेर फिरताना 10 पैकी 7 लोक स्वत:ला सुरक्षित समजतात.
राष्ट्र सुरक्षा, महिला सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख मुद्दे आहेत. गॅलप वर्ल्ड पोलच्या सर्वेक्षणानुसार 10 पैकी 7 भारतीयांना मोदी सरकारच्या कार्यकाळात मध्यरात्री फिरताना सुरक्षित वाटते. मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर, असे मत असलेल्यांची संख्या 17 टक्क्यांनी वाढली आहे. गॅलप वर्ल्ड पोल जगभरातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सर्वेक्षण करते. 2005 पासूनच भुकबळी, रोजगार, लिडरशीप परफॉर्मेंस यांसारख्या अनेक मुद्द्यांवर या संस्थेने सर्वे केले आहेत. गॅलप ने भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत एक सर्व्हे केला. त्यामध्ये नागरिकांना व्यक्तिगत सुरक्षेपेक्षा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रणी घेत चिंता जोर दिला. या सर्वेनुसार 2017 मध्ये देशात 1000 दहशतवादी हल्ले झाले आहेत. जगभरात इराक आणि अफगानिस्ताननंतर भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
गॅलप सर्वेक्षणानुसार सुरक्षेसंदर्भात ग्रामीण आणि शहरी भारतीयांची मते वेगवेगळी आहेत. तर, प्रादेशिक विभागानुसारही यात भरपूर फरक आहे. पूर्व भारतातील 78 तर दक्षिण भारतातील 75 टक्के नागरिक रात्री बाहेर फिरताना स्वत:ला सुरक्षित समजतात. तर 60 टक्के उत्तर भारतीयांना सुरक्षित वाटते. दरम्यान, 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2016 च्या गुन्हेगारी आकडेवारीनुसार दिल्लीसह 20 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 19 शहरांमध्ये हत्या, बलात्कार आणि अपहरण यांसारख्या घटनांत वाढ झाली आहे.