नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पिट बुल हल्ल्याची घटना समोर आली आहे. येथे पिट बुल कुत्र्याने एका मुलीवर हल्ला केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दिल्लीतील जगतपुरी भागातील आहे. येथे काल रात्री ८.४७ वाजता सात वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी शेजारच्या पाळीव कुत्र्या पिट बुलने मुलीवर हल्ला केला आणि तिला ओढत नेले. कुत्र्याने मुलीला चावा घेऊन गंभीर जखमी केले. मुलीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी धाव घेत मुलीला वाचवले.
यानंतर मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आढावा घेतला. मुलीच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. मुलीवर हेडगेवार रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कुत्र्याच्या मालकावर भादंवि कलम २८९ आणि ३३७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.