नवी दिल्ली - गेल्या बऱ्याच काळापासून सुरू असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. जून महिन्यातील एआयसीपीआयचे आकडे समोर आल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. आता त्याची घोषणा झाली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारने याची घोषणा केली आहे. डीएमध्ये होणारी वाढ ही एआयसीपीआयच्या आकड्यांवर अवलंबून असते. एआयसीपीआयच्या पहिल्या सहामाहीमधील आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या आलेखानुसार आता नवा आकडा ०.२ पॉईंटच्या वेगासह १२९.२ वर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना लाभ होणार आहे.
डीएमध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ३८ टक्के झाला आहे. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के होता. महागाई भत्ता सप्टेंबर २०२२ च्या पगारापासून लागू होणार आहे. तर वाढलेला डीए जुलैपासून लागू झाला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टच्या एरियरची रक्कमही येणार आहे. एकूण सणांच्या काळात कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये डीए एरियरसोबत भरपूर रक्कम जमा होईल.