श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईनंतर याठिकाणी हिंसाचार उसळला. येथील स्थानिक नागरिकांचा जमाव सुरक्षा जवानांवर चालून आला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात आठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर या चकमकीत एक जवान शहीद झाला. यावेळी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले. राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूरचेही नाव होते. सुरक्षा जवानांनी त्याचा खात्मा करून मोठे यश मिळवले आहे. मात्र, दुसरीकडे दहशतवाद्यांविरोधातील कारवाईनंतर येथील स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री झाली. यावेळी नागरिकांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. सुरक्षा जवानांनी नागरिकांचा जमाव पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात आठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याचबरोबर, अद्यापही दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्च ऑपरेशन राबवले जाते आहे. अनेक तास चाललेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांना हिजबुलचा कमांडर जहूर ठोकर याचा खात्मा करण्यात यश आले आहे. यादरम्यान एक जवानही जखमी झाला आहे. सध्या तरी सुरक्षा जवानांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.