नवी दिल्ली : भारतातून यावर्षी सौदी अरेबियात हजयात्रेसाठी पुरुष सहकाºयाशिवाय एकट्या जाणाºया महिलांपैकी ८६ टक्के महिला केरळच्या असतील. अलीकडेच जाहीर झालेल्या सरकारी डेटातून ही माहिती समोर आली आहे.या डेटानुसार, हज यात्रेसाठी एकट्या जाणाºया २,३४० महिलांपैकी २,०११ महिला केरळमधील आहेत. एवढेच नव्हे, तर केरळातून पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला आहे. केरळातून एकूण ११,००० यात्रेकरू हजला जाणार आहेत.यात ६,९५९ महिला आणि ४,५१३ पुरुष आहेत. गतवर्षी सरकारने नियमात बदल केला आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना पुरुष सहकाºयाशिवाय यात्रेला जाण्याची परवानगी दिली. याचा फायदा केरळच्या महिलांनी घेतल्याचे दिसत आहे. गतवर्षीही एकट्या जाणाºया १,३४० महिलांपैकी १,१२४ महिला केरळच्या होत्या.तामिळनाडूतून ३७, महाराष्ट्र ३१, मध्यप्रदेश २७, राजस्थान २६ आणि कर्नाटकातून २३ महिला एकट्या जाणार आहेत. दिल्लीतून १२, बिहार ९, आसाम ८, झारखंड ५ आणि छत्तीसगडमधून ४ महिला एकट्या हज यात्रेला जाणार आहेत. एकट्या जाणाºया सर्वाधिक वयाच्या महिलांमध्ये ८७ वर्षांची महिला आहे. याशिवाय एक महिला ८० वर्षांची आणि एक ८२ वर्षांची आहे.काय आहे कारण?केरळ हज समितीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, यामागे शिक्षण आणि लैंगिक समानता हे कारण आहे. २०१८-२२ साठी तयार करण्यात आलेल्या हज धोरणानुसार महिलांना एकट्यांना हज यात्रेसाठी जाण्याची परवानगी आहे. यासंदर्भात मिळालेल्या डेटामधून हे समजते की, उत्तर प्रदेशातून ९९ आणि पश्चिमेतून केवळ ३९ महिला एकट्या हज यात्रेला जाणार आहेत.
हज यात्रेला एकट्या जाणाऱ्या ८६ टक्के महिला केरळातील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 3:40 AM