सरगुजा : एका पोलिस अधिकाऱ्याचे अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पाच वर्षे वयाच्या लहान मुलाची पोलिस दलात ‘चाइल्ड कॉन्स्टेबल’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नमन राजवाडे असे या मुलाचे नाव असून तो बालवाडीत शिकत आहे. छत्तीसगड येथील सरगुजा येथील तो रहिवासी आहे.
नमन याचे वडील व पिलीस अधिकारी राजकुमार राजवाडे यांचे एका अपघातात निधन झाले. त्यानंतर प्रशासनाने अनुकंपा तत्त्वावर नमन याची पोलिस दलात चाइल्ड कॉन्स्टेबलपदी नियुक्ती केली. राजवाडे यांची पत्नी नीतू यांनी सांगितले की, मुलगा नमन याच्याबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने आम्हाला दिलासा मिळाला आहे.
पोलिस अधीक्षक भावना गुप्ता यांनी सांगितले की, पोलिस मुख्यालय व प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार नमन याची चाइल्ड कॉन्स्टेबलपदी नियुक्ती करण्यात आली. राजकुमार यांचा मुलगा नमनबाबत जो निर्णय घेण्यात आला तो नियमांना धरूनच आहे. एखादा पोलिस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल पोलिस सेवेत असताना मरण पावला व त्याचा वारसदार १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याची चाइल्ड कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती करण्यात येते. (वृत्तसंस्था)