भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर रेल्वे ट्रॅक टाकण्यास सुरुवात केली होती. आता, या रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून या रेल्वे मार्गावरुन पहिली ट्रेनही धावली. अर्थात ही रेल्वे टेस्टींग राईडसाठी धावली आहे. मात्र, भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा रेल्वे वाहुतकीमध्ये माईलस्टोन गाठला आहे. २१ मार्च रोजी उधमपुर-श्रीनगर-बारामुल्ला या ट्रॅकवर यशस्वी टेस्टींग करण्यात आलं. नदी तळापासून या पुलाची उंची तब्बल ३५९ मीटर उंच एवढी आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या पुलावरील रेल्वे टेस्टींगचा व्हिडिओ शेअर केलाय.
आनंद महिंद्रा हे आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने चाहत्यांना नवनवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत असतात. त्यामध्ये, बहुतांशी हे टेक्नॉलॉजी किंवा जुगाडू व्हिडिओ असतात. अनेकदा देशातील किंवा जगातील वेगळेपण दर्शवणारे व्हिडिओही असतात. तर, ऑटोमोबाईल क्षेत्रावरील नव्या संशोधनावरही ते बोलत असतात. चाहत्यांसोबत ते सोशल मीडियातून रिएक्ट होतात, त्यामुळे त्यांचा फॅन फॉलोविंग वर्गही मोठा आहे. नुकतेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ भारतीय रेल्वेचं सामर्थ्य आणि सौंदर्य दर्शवणारा आहे.
यूएसबीआरएल योजनेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेनं आणखी एक माईलस्टोन गाठलाय. जम्मू आणि काश्मीरच्या चिनाब पुलावरील रेल्वे ट्रॅकचं काम आता पूर्ण झालंय. गेल्याच महिन्यात हे काम सुरु करण्यात आल्याचं रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितलं होतं. आता, या मार्गावर रेल्वे धावली असून तपासणी पूर्ण झालीय. हा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाल्यास जम्मू आणि कश्मीरच्या दूरस्थ आणि डोंगर प्रदेशात नव्या संधी निर्माण होतील हे निश्चित. म्हणूनच, जगातील सर्वात उंच पुलावरुन धावणारी ही रेल्वे भारतीय रेल्वेचं सामर्थ्यशाली पाऊल आहे.
दरम्यान, हा पुल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर उंच आहे. या पुलाची लांबी १.३ किमी असून २००४ साली या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. मात्र, येथील नैसर्गिक वातावरण, जोरदार सुसाट्याचा वारा, त्यामुळे २००८ मध्ये हे काम थांबवण्यात आलं होतं.