जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध! पत्नी वैतागली अन् उद्योगपती पतीला ९ वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 05:12 PM2023-12-25T17:12:17+5:302023-12-25T17:12:42+5:30
छत्तीसगडमधून एक अनोखी घटना समोर आली आहे.
छत्तीसगडमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील एका व्यावसायिकाला नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या व्यावसायिकावर पत्नीला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप होता आणि तो सिद्ध झाल्यामुळे आरोपी उद्योगपतीला नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. दुर्गच्या फास्ट ट्रॅक्ट कोर्टात हा खटला सुरू होता. संबंधित व्यापारी हा भिलाई-दुर्ग शहरातील आहे. २००७ मध्ये त्याचे लग्न झाले. पण, लगेचच जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंधांसह मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप व्यावसायिकाच्या पत्नीने केला.
न्यायालयाने सुनावली शिक्षा
अनैतिक शारिरीक संबंधांसह उद्योगपतीच्या पत्नीने विविध आरोप केले आहेत. हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप व्यावसायिकाच्या पत्नीने केला आहे. या सगळ्यामुळे त्रासून तिने सासरचे घर सोडले आणि एकटी राहून तिने आपल्या मुलीचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये ती तिच्या मुलीसह माहेरच्या घरी परतली. पीडित महिलेने ७ मे २०१६ रोजी सुपेला पोलील ठाण्यात पती आणि त्याच्या घरच्यांविरूद्ध आयपीसी कलम ३७७ अन्वये अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि कलम ४९८ए अंतर्गत हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
जबरदस्ती करणं भोवलं
पीडित महिलेने केलेले आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने तिच्या पतीला शिक्षा सुनावली. न्यायालयाने आदेशात म्हटले, "गुन्ह्याचे स्वरूप पाहता आरोपीवर कारवाई होईल. आरोपीचा गुन्हा आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत येतो, जो दंडनीय गुन्हा आहे. कलम IPC च्या ३२३ अंतर्गत (जाणूनबुजून त्रास देणे) एक वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड देखील आयपीसी अंतर्गत ठोठावण्यात आला आहे."
पीडित महिलेच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये लग्न झाल्यानंतर पीडितेला मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागला. एवढेच नाही तर या सगळ्यासोबतच तिला जबरदस्ती अनैसर्गिक शारीरिक संबंध देखील ठेवावे लागले. शारीरिक व मानसिक छळासोबतच हुंड्यासाठी देखील तिचा छळ केला जात होता.