RBI च्या सल्ल्याकडे दुर्लक्ष! मेसेज आला अन् लिंक ओपन करताच अकाउंट झालं खाली; एक लाखाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 03:47 PM2023-01-29T15:47:48+5:302023-01-29T15:48:54+5:30
Banking Fraud: मेसेज आणि ईमेलद्वारे बँकिंग फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असतात.
नवी दिल्ली : मेसेज आणि ईमेलद्वारे बँकिंग फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. अनेक प्रकारे समज देऊनही लोक सायबर गुन्हेगारांच्या तावडीत अडकत असल्याच्या घटना वारंवार घडतात. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एका महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. संबंधित महिलेच्या मोबाईलवर एक मेसेज आला ज्यामध्ये लिंकवर जाऊन आवश्यक माहिती मागवण्यात आली. असे करून या महिलेच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले.
एक लाखाची फसवणूक
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या DLF फेज-5 मध्ये राहणारी माधवी दत्ता ही महिला सायबर गुन्हेगारांची शिकार झाली आहे. मात्र, देशातील ही पहिलीच घटना नसून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक करतात. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पीडित माधवी दत्ता या महिलेच्या मोबाईलवर 21 जानेवारी रोजी एक मेसेज आला होता, ज्यामध्ये लिहिले होते, "प्रिय युजर, तुमचे एचडीएफसी खाते आज बंद केले जाईल, येथे क्लिक करा आणि तुमचा पॅन कार्ड नंबर मोबाईल क्रमांकाशी लिंक करा."
महिलेने सांगितली आपबीती
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत माधवी दत्ता यांनी म्हटले, त्यांनी लिंकवर क्लिक केले, जी त्यांना एका वेबपेजवर घेऊन गेली. तिथे तपशील देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी आला. त्यांनी ओटीपी टाकताच खात्यातून एक लाख रुपये उकळले गेले. सायबर हेल्पलाइन 1930 वर अनेक वेळा कॉल केला पण संपर्क होऊ शकला नाही आणि शेवटी सायबर पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीनंतर, सायबर क्राईम पूर्व पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 419 आणि 420 (फसवणूक) अंतर्गत अज्ञात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"