महाबैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून AAP गायब; काय आहे इनसाईड स्टोरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:39 PM2023-06-23T17:39:32+5:302023-06-23T18:04:13+5:30
देशभरातील १५ विरोधी पक्षांची महाबैठक आज बिहारची राजधानी पाटणा येथे झाली
पाटणा - भाजपा सरकारविरोधात एकजुटीचा नारा देणाऱ्या विरोधी पक्षांना मोठा झटका लागला आहे. विरोधकांच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेस-आम आदमी पक्ष यांच्यात कुरघोडी पाहायला मिळाली. बैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाने दांडी मारली. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता केजरीवाल यांचे प्लेन होते, त्यामुळे ते दिल्लीला निघून गेले असं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.
देशभरातील १५ विरोधी पक्षांची महाबैठक आज बिहारची राजधानी पाटणा येथे झाली. पाटण्यात होत असलेल्या या बैठकीला २७ प्रमुख नेते उपस्थित होते. जवळपास ४ तासाहून अधिक ही बैठक झाली. त्यात आम आदमी पक्षानेही सहभाग घेतला. त्या बैठकीत काँग्रेस-आपमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्या बैठकीनंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित नव्हते.
अरविंद केजरीवाल घेणार पत्रकार परिषद
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित न राहता स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेससोबतच्या वादावर बोलतील. याआधीही केजरीवालांनी म्हटलं होते की, जर काँग्रेसने दिल्लीतील अध्यादेशाचा विरोध केला नाही तर आप पाटण्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार नाही.
अध्यादेशावर पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार निर्णय
दिल्ली सेवा अध्यादेशावर आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतला जाईल. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, कदाचित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माहिती नसावे, अध्यादेशाचा विरोध अथवा समर्थन संसदेच्या बाहेर होत नाही. संसदेच्या आत होते. संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष मिळून अजेंडा बनवतात. १८-२० पक्षांची बैठक होते. ज्यात प्रत्येक पक्षाचा नेता उपस्थित असतो. या अध्यादेशाबाबत बाहेर इतका प्रचार का केला जातोय हे माहिती नाही. अध्यादेशाबाबत निर्णय संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.