AAP: मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या गुजरात दौऱ्यावर मोठा खर्च, RTI मधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 06:28 PM2022-05-08T18:28:37+5:302022-05-08T18:29:23+5:30
अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी अहमदाबाद येथे एक रोड शोचंही आयोजन केलं होतं.
नवी दिल्ली - आपल्या धडाकेबाज विजयामुळे आणि पंजाबमध्ये घेतलेल्या जनहिताच्या निर्णयामुळे चर्चेत असलेल्या आम आदमी पक्षाचा गुजरात दौरा आता चांगलाच चर्चेत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते. 1 ते 3 एप्रिल रोजी ते गुजरातमध्ये होते, या दौऱ्यात त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचारदौरा केला. साबरमती आश्रमासह इतरही प्रमुख ठिकाणी त्यांनी दौरा केला. सरकारी तिजोरीतील पैसा जनतेच्या कामासाठी वापरायचा, हा पैसा जनतेचा म्हणून मान यांनी पंजाबमध्ये अनेक निर्णय घेतले. मात्र, गुजरात दौऱ्यावर अनावश्यक खर्च केल्याने ते ट्रोल होत आहेत.
अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी अहमदाबाद येथे एक रोड शोचंही आयोजन केलं होतं. या सभेतून त्यांनी तेथील जनतेशी संवाद साधला. बठिंडा निवासी हरमिलाप सिंह ग्रेवाल, जे यापू्र्वी आम आदमी पार्टीचे सदस्य होते. मात्र, पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने ते संयुक्त समाज मोर्चाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ग्रेवाल यांनी भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांच्या गुजरात आणि हिमाचल दौऱ्याच्या खर्चाची माहिती आरटीआयद्वारे मागितली होती.
नागरी उड्डाण विभागाने आरटीआयला दिलेल्या उत्तरात, मुख्यमंत्र्यांच्या 1 ते 3 एप्रिल रोजीच्या गुजरात दौऱ्यासाठी भाड्याने विमान घेण्यात आले होते. त्यासाठीचे, 44 लाख 85 हजार 967 रुपयांचे बिल विभागाला प्राप्त झाले आहे. दरम्यान, विभागाकडून उत्तरात असेही म्हटले की, 6 एप्रिल रोजीची हिमाचल दौऱ्याची यात्रा सरकारी हेलिकॉप्टरने करण्यात आली होती. ज्याचा सरकारी दौऱ्यात समावेश करण्यात आला आहे.