काँग्रेसला धक्का! 'इंडिया' आघाडीतून मोठ्या पक्षाची एक्झिट; दिल्लीत केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 12:07 AM2024-06-07T00:07:35+5:302024-06-07T00:08:21+5:30
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पुढील रणनीतीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए सातत्याने बैठका घेत आहेत. त्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली इंडिया आघाडीतून एका पक्षाने बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच दिल्लीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी तुटल्याची घोषणा करण्यात आली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका आप स्वबळावर लढणार आहे. काँग्रेससोबत केवळ लोकसभेत आघाडी होती, विधानसभेला नको अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. आपच्या आमदारांची दिल्लीत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
आमदारांच्या बैठकीनंतर आपचे संयोजक गोपाल राय यांनी म्हटलं की, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी नसेल. २०२५ च्या सुरुवातीला दिल्लीत विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि येणारी विधानसभा निवडणूक यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी असा निर्णय पक्षाने घेतला असल्याचं गोपाल राय यांनी सांगितले.
तसेच लोकसभा निवडणूक आम्ही प्रामाणिकपणे लढलो. मात्र विधानसभेला आम्हाला आघाडी नको. दिल्लीच्या जनतेला सोबत घेत आम्ही विधानसभेची लढाई लढू आणि जिंकू. आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने विधानसभेची निवडणूक लढेल असं गोपाल राय यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत ७ मतदारसंघात आप आणि काँग्रेस आघाडीने उतरली होती. त्यातील ४ जागांवर आप आणि ३ जागांवर काँग्रेसनं उमेदवार उभे केले. मात्र दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेस-आम आदमी पक्षाच्या आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे निकालाच्या तिसऱ्याच दिवशी आप पक्षाने एकला चलो रे नारा दिला आहे.
#WATCH | Delhi Minister Gopal Rai says, "This is clear from the very first day that the INDIA alliance was formed for Lok Sabha elections. As far as Vidhan Sabha is concerned, no alliance has been formed. AAP will fight elections with its full strength." pic.twitter.com/NaymN3cS9h
— ANI (@ANI) June 6, 2024
दरम्यान, निवडणुकीत दोन्ही पक्षांची मते एकमेकांना ट्रान्सफर करण्यात काँग्रेस-आपला अपयश आलं. त्याचसोबत पक्षाचे मोठे नेते जेलमध्ये राहिल्याने निवडणूक प्रचारात आप ताकदीने उतरू शकली नाही. त्यात स्वाती मालीवाल प्रकरणामुळे आम आदमी पक्षाचे नुकसान झालं. भाजपानं महिला सुरक्षेचा मुद्दा प्रचारात आणला. त्यात आम आदमी पक्ष बचावात्मक पवित्र्यात आला त्यामुळे दिल्लीत नुकसान झालं असं म्हटलं जातं.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले होते?
एका मुलाखतीत अरविंद केजरीवालांनी काँग्रेससोबत आघाडीवर म्हटलं होतं की, आम्ही काँग्रेससोबत पर्मंनंट लग्न केले नाही. ना आमचं लव्ह मॅरेज झालंय, ना अरेंज मॅरेज..संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचा पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला आहे असं अरविंद केजरीवांनी विधान केले होते.