- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात लोकांमध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’द्वारे आपली लोकप्रियता व स्वीकारार्हता वाढवणाऱ्या आम आदमी पार्टीला (आप) भाजपने ‘आयुष्मान भारत’द्वारे टक्कर देण्याचे ठरवले आहे.दिल्लीच्या १४ जिल्ह्यांत व अनधिकृत कॉलन्यांमध्ये भाजप आरोग्य शिबिरे लावून ‘आयुष्मान भारत’चा प्रचार करण्यात गुंतला आहे. या शिबिरांत लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्याबरोबरच दिल्लीच्या बाहेरील रहिवाशांना आधार किंवा व्होटर कार्ड पाहून संधी मिळताच ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत आरोग्य विमा कार्ड बनवण्यात येणार आहे. भाजप देशातील गरिबांना ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देत असताना ही योजना केजरीवाल सरकार दिल्लीत लागू करीत नाही, हा संदेश या मोहिमेद्वारे जनमानसापर्यंत पोहोचवायचा आहे.भाजपने निवडणूक आयोगाद्वारे आरोग्य शिबिरे लावण्यासाठी औपचारिक मंजुरी पदरात पाडून घेतलेली आहे.लोकसभा निवडणुकीची ही संधी साधून भाजप मतदारांमध्ये आतापासूनच पुढच्या निवडणुकीसाठी बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नाला लागली आहे.भाजप मीडिया सेलचे प्रमुख नीलकांत बक्षी यांनी लोकमतला सांगितले की, केंद्राकडून चालवल्या जात असलेल्या योजनेतगरीब कुटुंबाला मोफत पाच लाख रुपयांचा विमा दिला जात आहे. यामुळे गरीब लोक पैशाच्या अभावामुळे उपचारांपासून वंचित राहणार नाहीत. दिल्ली सोडून देशभरातील हजारो लोक ‘आयुष्मान भारत’मध्ये गंभीर आजारांवर उपचार घेऊन निरोगी जीवन जगत आहेत.>रांगापासून झाली सुटकादिल्ली सरकारने मोहल्ला क्लिनिक योजना लोकांना घराजवळच मोफत उपचार देण्यासाठी सुरू केली आहे. ताप, सर्दी, खोकला, चर्मरोग, उलट्या याबरोबरच मधुमेहींना याद्वारे औषधी मिळतील. यामुळे दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांतील गर्दी कमी झाली असून, छोट्या आजारांसाठी लोकांची रुग्णालयाच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका झाली आहे; परंतु राज्य सरकारने केंद्राची ‘आयुष्मान भारत’ योजना लागू केलेली नाही.
‘आप’चे ‘मोहल्ला क्लिनिक’ भाजपाचे ‘आयुष्मान भारत’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 5:22 AM