नवी दिल्ली : आसाम विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारांचा कौल मागत असलेल्या ३४५ उमेदवारांपैकी ११ टक्के उमेदवारांनी आमच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती शपथपत्रांत दिली आहे, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) अहवालात म्हटले.
आसाम इलेक्शन वॉच आणि एडीआरने ३४५ उमेदवारांनी शपथेवर दाखल केलेल्या शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. एक एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. ३४५ उमेदवारांपैकी ३७ (११ टक्के) जणांनी आमच्याविरोधात फाैजदारी गुन्हे तर ३० (९ टक्के) जणांनी आमच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे नमूद केले आहे. एडीआरने अहवालात या उमेदवारांच्या आर्थिक परिस्थितीचीही माहिती दिली आहे. त्यानुसार ७३ (२१ टक्के) उमेदवार हे कोट्यधीश आहेत.
या उमेदवारांनी त्यांच्याविरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.३४ उमेदवारांपैकी १० (२९ टक्के) भाजपचे, १९ पैकी तीन (१६ टक्के) आसाम जातिया परिषदेचे, सातपैकी तीन (४३ टक्के) एआययुडीएफचे, सहापैकी दोन (३३ टक्के) एजीपी, २८ पैकी दोन (७ टक्के) काँग्रेसचे आणि एआयएफबी, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि एसयुसीआयच्या (सी) प्रत्येकी एका उमेदवाराने त्यांच्या शपथपत्रांत आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. तीन उमेदवारांनी त्यांच्याविरोधात महिलांबाबतीत प्रकरणे असल्याचे जाहीर केले आहे. यातील एकाने त्याच्यावर बलात्काराचा (कलम ३७६) गुन्हा दाखल असल्याचे नमूद केले आहे. तीन उमेदवारांनी त्यांच्याविरोधात खूनाचे (कलम ३०२) तर दोन उमेदवारांनी त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचे (कलम ३०७) गुन्हे दाखल असल्याचे म्हटले.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?इतर प्रमुख पक्षांमध्ये ३४ उमेदवारांपैकी ११ (३२ टक्के) भाजपचे, २८ उमेदवारांपैकी पाच (१८ टक्के) काँग्रेसचे, सातपैकी पाच (७१ टक्के) जण हे एआययूडीएफचे, सहापैकी दोन (३३ टक्के) हे एजीपीचे, १९ पैकी तीन (१६ टक्के) आसाम जातिया परिषदेचे आणि प्रत्येकी एक उमेदवार एआयएफबी, एसयूसीआय (सी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचा आहे.