जय श्रीराम म्हणण्यास विरोध केल्यानं आसाममध्ये तीन मुस्लिम तरुणांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 09:59 AM2019-07-07T09:59:19+5:302019-07-07T09:59:25+5:30
जय श्रीराम न म्हटल्यानं मुस्लिम तरुणांना मारहाण करण्याचं पुन्हा एक प्रकरण समोर आलं आहे
गुवाहाटी- जय श्रीराम न म्हटल्यानं मुस्लिम तरुणांना मारहाण करण्याचं पुन्हा एक प्रकरण समोर आलं आहे. आसामच्या बारपेटा जिल्ह्यात चार समाजकंटकांनी तीन मुस्लिम तरुणांना अमानुष मारहाण केली आहे. त्यांना जय श्रीराम म्हणण्यास बाध्य करण्यात आलं. दोन आठवड्यांपूर्वीच काही मुस्लिम तरुणांना जय श्रीराम म्हणण्यास दबाव टाकल्यानं काही तरुणांना अटक करण्यात आली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, फखरुद्दीन अली अहमद मेडिकल कॉलेजच्या जवळ एक गाव आहे. शुक्रवारी इथे चार बाइकस्वार पोहोचले आणि त्यांनी एक कर्मचारी रकीबुल हक याला मारहाण केली. वेस्ट बारपेटा ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष जाकिर हुसैन म्हणाले, समाजकंटकांनी कुर्बान खान आणि बुरान अली यांना पकडलं. ही दोन्ही मुलं एका चहाच्या टपरीवर काम करतात. ते समाजकंटक कोणतंही कारण नसताना कुर्बान खान आणि बुरान अली यांना शिवीगाळ करू लागले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्या समाजकंटकांनी तिन्ही तरुणांना जय श्री राम म्हणण्यास बाध्य केलं.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील दोषींना लवकरच अटक करणार असून, योग्य शिक्षा दिली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्या समाजकंटकांच्या मोटारसायकलीही जप्त केल्या आहेत. तत्पूर्वी असदुद्दीन ओवैसींनी या प्रकरणावरून संघावर टीका केली होती.
ओवैसींनी संघालाही लक्ष्य केलं होतं. इथे कथित स्वरूपात 'जय श्री राम' आणि 'वंदे मातरम' न म्हटल्यास मुस्लिमांना मारहाण केली जाते. लोकांना मारहाण केली जाते, कारण ते जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा देत नाहीत. अशा घटना आता थांबणार नाहीत. फक्त मुसलमान आणि दलितांना टार्गेट केलं जातंय. अशा घटनांच्या मागे एक गट आहे आणि तो संघ परिवाराशी निगडित आहे, असं ओवैसी म्हणाले होते.