देशातील कोळशाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झारखंडमधील धनबाद येथे हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बड्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या फॉर्च्युनर कारच्या धडकेत बीसीसीएलमधील एका इंजिनियर दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कोलकातामधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा अपघात शुक्रवारी रात्री ११ ते १२ च्या सुमासार धनबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धैया परिसरात घडला. बीसीसीएलमध्ये सर्वेयर म्हणून काम पाहत असलेले राणा दास आणि त्यांची पत्नी मानसी दास यांचा या अपघातातमृत्यू झाला. राणा यांच्या भावाने सांगितले की, राणा त्यांच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. तेव्हा त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती.
मुलाला डॉक्टरकडे दाखवल्यानंतर राणा हे दुचाकीवरून पत्नी आणि मुलग्याला घेऊन घरी येत होते. वाटेत दोन फॉर्च्युनर कारचालक रेस लावून रस्त्यावरून भरधाव जात होते. फॉर्च्युनर कार भरधाव वेगाने जात होती. या कारने राणा यांच्या दुचाकीला दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे राणा आणि त्यांची पत्नी हवेत उडाले.
राणा दास यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी मानसी यांच्या उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच मानसी यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये या दाम्पत्याचा मुलगा ऋषभ दास गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कोलकात्यामधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राणा दास यांच्या भावाने सांगितले की, ज्या कारने भावाच्या दुचाकीला टक्कर दिली आहे. ती झरिया येथील आमदार पूर्णिमा नीरज यांचा दीर हर्ष सिंह याची रजिस्टर्ड कंपनी एमएस सिंह नॅच्युरल्स अँड प्रा.लि.च्या नावावर आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत झरिया विधानसभा मतदार संघातून पूर्णिमा नीरज सिंह यांनी विजय मिळवला होता.