महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच
By Admin | Published: October 6, 2015 12:21 AM2015-10-06T00:21:10+5:302015-10-06T00:21:10+5:30
> महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच राज्य निवडणूक आयोग : निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती नागपूर : महापालिका निवडणुका या सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तेव्हा शासन यात दुसरा निर्णय घेत नाही, तोपर्यंत तरी एक वॉर्ड एक प्रतिनिधी या धर्तीवर निवडणुका होतील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी येथे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही वॉर्ड नुसार होणार की प्रभाग पद्धतीनुसार होणार, यावर सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहारिया यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली. आजच्या घडीला निवडणूक झाली तर ती वॉर्ड पद्धतीनुसारच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु सोबतच पुढे शासन कोणता निर्णय घेईल, हे सांगता येत नाही, अशी पुष्टीही जोडली. राज्यात डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात होणार आहेत. या निवडणुकीमध्ये मतदान करता यावे म्हणून ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होाऱ्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत. तसेच नाव, पत्त्यातील बदल, किंवा मृत व्यक्तीचे अथवा दुबार नावे वगळावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते. बॉक्स.. इव्हीएम मशीनवर उमेदवारांचा फोटो काही राज्यांमध्ये इव्हीएम मशीनवर उमेदवारांचे छायाचित्र वापरण्याचा प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्रातही तसा प्रयोग करण्याचा विचार सध्या सुरू असल्याचे सहारिया यांनी यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. बॉक्स.. मुख्यमंत्र्यांसंदर्भात अद्याप कुठलीही तक्रार नाही कल्याण-डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे सध्या तरी अशी कुठलीही तक्रार आलेली नाही. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कुठलेही उल्लंघन होणार नाही, यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, तक्रार आल्यास नियमानुसार कारावई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.