बंदूक दाखवत गुंडगिरी करणाऱ्या खासदारपुत्राचे पलायन, आशिष पांडेय नेपाळला पळाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 11:56 AM2018-10-17T11:56:38+5:302018-10-17T11:57:00+5:30
राजधानी नवी दिल्लीतील 5 स्टार हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडेयचा पोलीस शोध घेताहेत.
लखनौ - राजधानी नवी दिल्लीतील 5 स्टार हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडेयचा पोलीस शोध घेताहेत. आशिष पांडेयच्या शोधासाठी दिल्ली पोलीस उत्तर प्रदेशच्या बस्तीकडे निघाले आहेत. मंगळवारी (16 ऑक्टोबर) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचे शेवटचे लोकेशन बस्ती येथे आढळून आले होते. आशिषनं नेपाळमध्ये पळ काढल्याचा संशय वर्तवण्यात आल्यानं नेपाळ सीमेजवळील पोलिसांना सतर्क करण्यात आले.
दरम्यान, यापूर्वी नवी दिल्लीतील आशिषच्या फ्लॅटसहीत त्याच्या ऑफिसचीही पोलिसांनी तपासणी केली. सरोजनीनगर पोलीस दिल्ली पोलिसांच्या पथकाला घेऊन आशिषच्या दिलकुशा येथील संतुष्टि अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 301-302मध्ये घेऊन गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत आशिष आपल्या फ्लॅटमध्येच होता. मात्र पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच त्यानं तेथून पळ काढला. आशिषसंदर्भात दिल्ली पोलिसांनी त्याचा फ्लॅट सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याची जवळपास 40 मिनिटांपर्यंत चौकशी केली. शिवाय, त्यानं दिल्ली पोलिसांसोबत आशिषचा संवादही घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे.
(माजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल)
#WATCH A man brandishes a gun outside a 5-star hotel in Delhi on October 14. A case has been registered in connection with the incident. #Delhipic.twitter.com/G14eqVJU0U
— ANI (@ANI) October 16, 2018
एसटीएफ करत आहे तपास
उत्तर प्रदेश एसटीएफचे एक पथक आशिष पांडेयचा शोध घेताहेत. डेप्युटी एसपी प्रमेश शुक्ला यांच्या नेतृत्वात पथक तपास करत आहे. आशिषच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांची मदत मागण्यात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर आशिष पांडेयनं पिस्तुलाच्या जोरावर एका जोडप्याला धमकी देत शिवीगाळ केली. शनिवारी (13 ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशिष पांडेय हा बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडेय यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या हातातील पिस्तुल दाखवत आशिष जोडप्याला धमकावत होता. आशिषसोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणी दिल्लीच्या आर. के. पुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.