नवी दिल्ली : लाल किल्ल्यावर २२ डिसेंबर २००० रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर १७ वर्षांपासून तपास यंत्रणांना गुंगारा देणारा लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी बिलाल अहमद कावा (३७) याला बुधवारी रात्री दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. दिल्ली व गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.पोलिसांनी बिलाल अहमद याच्या अटकेला दुजोरा दिला आहे. बिलाल श्रीनगरहून दिल्लीला विमानाने आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. काश्मिरात लेदर जॅकेट करण्याचा व्यवसाय बिलाल करत असे. चौकशीत त्याने सांगितले की, व्यावसायिक कामासाठी आपण नेहमीच दिल्लीला येत असतो. लाल किल्ल्यावरील हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप बिलालने फेटाळला आहे. मात्र, या हल्ल्यात तो होता, याचे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा पोलिसांनी केला आहे.काय आहे प्रकरण?अतिरेक्यांनी २२ डिसेंबर २००० रोजी लाल किल्ला परिसरात हल्ला केला होता. यात तीन सुरक्षा रक्षक शहीद झाले होते. हल्ल्यानंतर येथून पळून जाण्यात अतिरेकी यशस्वी झाले होते. बिलालच्या बँक खात्यावर हवालाच्या माध्यमातून २९.५ लाख रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम मोहम्मद अरिफ उर्फ अशफाक अहमद याच्याकडून बिलालच्या नावावर जमा करण्यात आली होती. मोहम्मद अरिफ हा या हल्ल्याचा मास्टर माइंड होता, अशी पोलिसांची माहिती आहे. पाकमधून सूत्रे हलविणाºयाकडून मोहम्मद अरिफ याला हवालामार्गे हे पैसे मिळाले होते.
लाल किल्ल्यावरील हल्ल्यातील आरोपी अखेर जेरबंद, दिल्लीमध्ये पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:18 AM