तिरुवअनंतरपुरम : एका विद्यार्थिनीला आलिंगन दिल्याबद्दल निलंबित करण्याच्या शाळेच्या कारवाईविरोधात संबंधित विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. संबंधित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शाळेने निलंबित केले आहे. या निर्णयावर केरळ उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांने घेतला आहे.बारावीतील हा विद्यार्थी आणि ती विद्यार्थिनी सेंट थॉमस सेंट्रल स्कूलमध्ये शिकतात. शाळेत 21 जुलै रोजी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एका प्रतियोगीतेमध्ये विद्यार्थिनी विजेती ठरल्यानंतर त्याने अभिनंदन करताना तिला अलिंगन दिलं. त्यानंतर अलिंगन दिल्यामुळे दोघांना शाळा प्रशासनाने निलंबीत केलं. त्या दोघांना पुढील वर्षी सीबीएसईची परीक्षा द्यायची आहे, पण शाळेने निलंबीत केल्यामुळे परीक्षा देता येईल की नाही याबाबतही संभ्रम आहे.
अलिंगन घेतल्यानंतर विद्यार्थिनीने आक्षेप घेतला नव्हता वा शाळेकडे तक्रारही केली नव्हती. तरी शाळेने दोघांवर कारवाई केली. शाळेने अनुचित कारवाई केल्याने माझा मुलगा मानसिकदृष्ट्या खचला आहे, असे या मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे. शाळेच्या निर्णयाविरुद्ध या मुलाच्या कुटुंबीयांनी केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे धाव घेतली होती.या विद्यार्थ्याला वर्गात बसू देण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश आयोगाने शालेय प्रशासनाला दिले होते. आयोगाच्या आदेशाला शालेय व्यवस्थापनाने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले असता उच्च न्यायालयाने शाळेचा निर्णय वैध ठरविला. त्यामुळे आता संबंधित विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.परीक्षेचा निर्णय सीबीएसईचा-शिस्त न पाळल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. सीबीएसईने या विद्यार्थ्याबाबत काय तो निर्णय घ्यावा. सीबीएसईने या मुलाला परीक्षा देण्याची परवानगी दिल्यास आमची काहीही हरकत नाही, असे शाळेचे प्राचार्य सेबॅस्टियन जोसेफ यांनी स्पष्ट केले.