श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील शोपियान परिसरातील आमशिपोरा गावात १८ जुलै रोजी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मारले गेलेले तिघे जण दहशतवादी नसून ते मजूर असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. या चकमक प्रकरणात लष्करी जवानांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
या चकमकीत ठार झालेल्या तीन जणांच्या डीएनएचे नमुने त्यांच्या कुटुंबियांच्या डीएनएशी जुळले. त्यातून तपासाला योग्य दिशा मिळाली व हे तिघे जण दहशतवादी नसून, मजूर असल्याचेही सत्य उजेडात आले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात लष्कराच्या जवानांनी लष्करी दल विशेष अधिकार कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. चकमकीत ठार झालेल्या तीन मजुरांच्या डीएनए नमुन्यांचे अहवाल आम्हाला मिळाले आहेत. त्यानुसार आता आम्ही पुढील तपास करणार आहोत. आमशिपोरा या गावातील चकमकीत ठार झालेल्यांमध्ये अब्रार अहमद (२५ वर्षे), इम्तियाझ अहमद (२०), मोहम्मद इबरार (१६) या तिघांचा समावेश आहे.निष्पाप मुलांना का ठार मारले?चकमकीत मारला गेलेल्या अब्रार अहमद याचे वडील मोहम्मद युसूफ म्हणाले की, आम्ही कोणाचे काय वाईट केले होते म्हणून आमच्या निष्पाप मुलांना अशा निर्घृण पद्धतीने ठार मारण्यात आले?