बंगळुरू: अभिनेते प्रकाश राज मध्य बंगळुरू मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. प्रकाश राज यांनी 1 जानेवारीला आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर अनेकांनी राज यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचे आभार मानत राज यांनी आपण मध्य बंगळुरूतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक लढवण्याबद्दलची अधिक माहिती देऊ, असं प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटच्या शेवटी त्यांनी सिटिझन्स व्हॉईस इन पार्लमेंट असा हॅशटॅग वापरला आहे. या ट्विटमध्ये प्रकाश राज यांचा फोटो आणि आठ विधानसभा मतदारसंघ दिसत आहेत. या आठ मतदारसंघांचा समावेश मध्य बंगळुरू लोकसभा मतदारसंघात होतो. मध्य बंगळुरू मतदारसंघात प्रकाश राज यांच्यासमोर भाजपाच्या पी. सी. मोहन यांचं आव्हान असू शकतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहन यांनी काँग्रेस उमेदवाराचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. मध्य बंगळुरू हा मतदारसंघ आधी उत्तर आणि दक्षिण बंगळुरूचा भाग होता. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर मध्य बंगळुरू मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून पी. सी. मोहन या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.