अभिनेते प्रकाश राज यांनी भाजपाच्या खासदाराला पाठविली कायदेशीर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 09:07 PM2017-11-23T21:07:21+5:302017-11-23T21:21:18+5:30
दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप सिम्हा यांना ट्रोल केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. प्रताप सिम्हा हे मैसूर-कोडागू मतदारसंघाचे खासदार आहेत.
बंगळुरु : दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप सिम्हा यांना ट्रोल केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. प्रताप सिम्हा हे मैसूर-कोडागू मतदारसंघाचे खासदार आहेत.
बंगळुरु येथे मीडियाशी बोलताना अभिनेते प्रकाश राज म्हणाले की, या देशातील नागरिकांना मी फक्त एक प्रश्न विचारला, परंतू मला यावरुन ट्रोल करण्यात आले. त्यामुळे माझ्या व्यक्तीगत आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मी प्रताप सिम्हा यांनी कायदेशीर प्रश्न विचारला आहे. जर त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, तर त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही प्रकाश राज म्हणाले.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात प्रकाश राज यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला होता. यावेळी ते म्हणाले होते, ज्या लोकांनी गौरी लंकेश यांची हत्या केली ते अद्याप पकडले गेले नाही. त्यांना पकडणे, शिक्षा करणे हा वेगळा मुद्दा आहे, मात्र देशात हजारो लोक असे आहे, जे सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा करत आहे. आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे हे कोण लोक आहेत आणि ते कोणत्या विचारधारेचे आहेत. मृत्यूवर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांपैकी काही असेही आहेत ज्यांना आमचे पंतप्रधान मोदी फॉलो करतात. मला याच गोष्टीची चिंता आहे, आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे?' पंतप्रधान त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियांवर मौन बाळगून आहेत. त्यांची चुप्पी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ते काय माझ्यापेक्षाही मोठे कलाकार होण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांचे मौन मला त्रस्त करत आहे. त्यांनी साधलेले मौन हे त्यांच्या फॉलोअर्सना मुक समर्थनाचा प्रयत्न आहे का?'असे प्रकाश राज म्हणाले होते.
प्रताप सिम्हा यांनी काय केले होते ट्विट ?
- खासदार प्रताप सिम्हा यांनी दोन ऑक्टोबरला ट्विट केले होते. त्यामध्ये प्रकाश राज यांच्यावर निशाणा साधत असे म्हटले होते की, आपल्या पत्नीला सोडून एक डान्सरसोबत जाणारा एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कोणत्या हक्काने आरोप करत आहे? असा सवाल केला होता.