चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम (ओपीएस) यांच्या नेतृत्वाखालील अद्रमुकचा गट व मुख्यमंत्री पलानीस्वामी (ईपीएस) यांचा गट यांचे विलिनीकरण सोमवारी होण्याची शक्यता आहे.दोन्ही गटांचे विलिनीकरण २२ आॅगस्टपूर्वी व्हावे, यासाठी भाजपकडून दबाव होता. अमित शाह येत्या मंगळवारी तामिळनाडूत येत आहेत. त्याच्या एक दिवस आधी विलीनीकरणाची घोषणा केली जाणार आहे. पनीरसेल्वम यांनी सांगितले की, विलीनीकरणाच्या वाटाघाटी प्रगतिपथावर आहेत.शशिकला व कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी आणि जयललिता यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी या ओपीएस गटाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. शशिकला यांची हकालपट्टी महिनाभरात होईल. विलीनीकरणानंतर ओपीएस यांना सरचिटणीसपदाच्या तोडीचे पद दिले जाईल, त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाईल. सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग ही मोठी खातीही ओपीएस गटाला मिळतील. ओपीएस गटाच्या नेत्याने सांगितले की, आमच्या १0 नेत्यांना सरकार किंवा पक्षात महत्त्वाची पदे मिळणार आहेत. (वृत्तसंस्था)ंं
अद्रमुक गटांचे विलीनीकरण सोमवारी, अमित शाह मंगळवारी तामिळनाडूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:52 PM