अडवाणी, मुरली मनोहर जोशींसह १३ ज्येष्ठांना भाजपाची उमेदवारी नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:30 AM2019-03-27T05:30:58+5:302019-03-27T05:35:01+5:30
लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ भाजपाने पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनाही उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आतापर्यंत उमेदवारी न दिलेल्या वरिष्ठ नेत्यांची संख्या १३ झाली आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ भाजपाने पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनाही उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आतापर्यंत उमेदवारी न दिलेल्या वरिष्ठ नेत्यांची संख्या १३ झाली आहे. अद्याप तिघा वरिष्ठ नेत्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय व्हायचा आहे.
शांताकुमार, करिया मुंडा, बी. सी. खंडुरी, भगतसिंह कोशियारी, बिजया चक्रवर्ती, हुकूमदेव नारायण यादव, बन्सीलाल महन्तो, राम तहल चौधरी यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने आधीच घेतला आहे. एका नेत्याने पक्षच सोडला आहे.
भाजपाने ७५ वर्षे ओलांडलेल्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचे धोरण आखले आहे. मात्र, इंदूरमधून निवडून येणाऱ्या लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन (वय ७६) यांचा अपवाद होण्याची चिन्हे आहेत. आता प्रभातसिंह चौहान, लीलाधरभाई वाघेला यांच्याबाबत निर्णय व्हायचा आहे. रामपूरमधून निवडून येणारे डॉ. नेपालसिेंह यांना उमेदवारी न देता, भाजपात मंगळवारी प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री जया प्रदा यांना लगेचच तिकीट दिले आहे.
वरिष्ठांच्या उमेदवारीबाबत भाजपाने सरचिटणीस राम लाल यांच्याकडे जबाबदारी सोपविली होती. ते जवळपास प्रत्येक वरिष्ठ नेत्याशी प्रत्यक्ष वा फोनवर बोलले. त्यांनी त्या नेत्यांनाच, आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही आहोत, असे निवेदन करण्यास सांगितले. अडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी वगळता सर्वांनीच त्यांचे म्हणणे मान्य करून तसे निवेदनही दिले. नजमा हेपतुल्ला यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण होताच स्वत:हून पक्षाला तसे कळविले होते. त्याचा त्यांना फायदा झाला आणि त्या राज्यपाल झाल्या. अडवाणी यांनी उमेदवारी न मिळाल्यापासून अवाक्षरही काढलेले नाही. मात्र, ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी तर खूपच नाराज झाले. पक्षाध्यक्षांनी वरिष्ठ नेत्यांविषयी आदर बाळगून हे करता आले असते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी कानपूरच्या मतदारांना पत्र लिहिले आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस रामलाल यांनी मला लोकसभेची निवडणूक लढवू नका, असे सांगितल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मनेका गांधी सुलतानपूरमधून; जया प्रदा रामपूरच्या उमेदवार
भाजपाने आज काही उमेदवारांची नावे जाहीर केली असून, आतापर्यंत पिलीभीतमधून निवडून येणाऱ्या मनेका गांधी यांना त्यांच्या विनंतीनुसार सुलतानपूरची उमेदवारी दिली आहे. त्यांनी पिलीभीतसाठी वरुण गांधींचे नाव सुचविले होते.
तेही पक्षाने मान्य केले आहे. पक्षात आज दाखल झालेल्या जया प्रदा यांना लगेचच रामपूरची उमेदवारी मिळाली, तर या आधी काँग्रेसमधून आलेल्या रिटा बहुगुणा यांना अलाहाबादमधून, जगदंबिका पाल यांना डोमरियागंज व केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना चंदोलीमधून उमेदवारी जाहीर केली आहे.