नवी दिल्ली : अंगणवाडी आणि आशा कार्यकर्तींना सरकारने दिलेल्या सुमारे ५0 टक्के मानधनवाढीमुळे त्यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. २५ लाख कार्यकर्तींना त्याचा लाभ मिळेल, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी व आशा कार्यकर्तींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. या निर्णयावर जेटली यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. जेटली यांनी म्हटले की, अंगणवाडी कार्यकर्ती आणि सहायक यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी दीर्घ काळापासून होत होती. तथापि, मागील सरकारांनी त्याकडे लक्ष दिले नव्हते. या सरकारने मात्र अर्थसंकल्पावर पडणाऱ्या ताणाचा विचार न करता त्यांच्या मानधनात सुमारे ५0 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम होईल.‘स्वच्छ भारत अभियान’चे कौतुक‘केंद्र सरकारचे दोन यशस्वी पुढाकार’ या शीर्षकाखाली जेटली यांनी ही पोस्ट लिहिली असून, स्वच्छ भारत अभियानाचे त्यांनी या पोस्टमध्ये कौतुक केले आहे. स्वच्छ भारत अभियान ही सरकारची सर्वांत यशस्वी योजना आहे, असा दावा त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही चार वर्षांत केलेल्या कामामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतागृहांची उपलब्धता ३९ टक्क्यांवरून ९२ टक्के झाली आहे.
२५ लाख अंगणवाडी कार्यकर्तींना मानधनवाढीचा लाभ : अरुण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 1:24 AM