गुरुग्राम, दि. 16 - रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षीय प्रद्युम्नचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार जोरात करण्यात आलेले वार आणि रक्त वाहून गेल्यामुळे प्रद्युम्नचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आलं आहे की, एका धारदार शस्त्राने दोन वेळा प्रद्युम्नच्या गळ्यावर वार करण्यात आले. प्रद्युम्नच्या गळ्यावर करण्यात आलेला पहिला वार 18 सेंमी लांब आणि 2 सेंमी रुंद आहे. तर दुसरा वार 12 सेंमी लांब आणि 2 सेंमी खोल आहे. हे वार इतके भयंकर होते की, प्रद्युम्नच्या गळ्याच्या पेशी, श्वासनलिका, अन्ननलिका कापल्या गेल्या. अहवालानुसार हल्ला इतका भीषण होता की, प्रद्युम्नला एक ते दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाचवणं अशक्य होतं.
अहवाल समोर आल्यानंतर आधीच गुंतागुतीचं झालेल्या हत्या प्रकरणात अजून काही नवे प्रश्न जोडले गेले आहेत. ही हत्या अचानक करण्यात आली होती, की यासाठी आधीपासून प्लानिंग करण्यात आलं होतं ? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय हत्येमध्ये फक्त एकाच व्यक्तीचा हात आहे की, अजून कोणी यात सामील आहे ? हा प्रश्नही समोर आला आहे. गुरुग्राम पोलीस आता सर्व बाजूंची चाचपणी करत आहे. याआधी आलेल्या अहवालानुसार, प्रद्युम्नसोबत कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं सांगण्यात आलं होतं.
याप्रकरणी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. दुसरीकडे, प्रशासनाने तीन महिन्यांसाठी रायन स्कूलचं व्यवस्थापन हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुग्रामचे पोलीस उपायुक्त विनय प्रताप सिंह यांनी सांगितलं आहे की, 'सोमवारी शाळा पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा आहे. त्याआधी सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी सर्व पालकांची बैठक बोलावण्यात आली आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न केला जाईल'.
हरियाणा सरकार भोंडसी येथील रायन इंटरनॅशनन स्कूलचं व्यवस्थापन तीन महिन्यांसाठी आपल्या हाती घेणार आहे. शाळेतील शौचालयात सात वर्षीय विद्यार्थी प्रद्युम्नची गळा कापून हत्या करण्यात आली होती. यानंतर शुक्रवारी प्रद्युम्नच्या आई वडिलांची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही घोषणा केली होती. संपुर्ण प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. प्रद्युम्नचे नातेवाईक वारंवार सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी करत होते.
जोपर्यंत सीबीआयकडे प्रकरण सोपवण्याची प्रक्रिया सुरु असेल, तोपर्यंत एसआयटी तपास करेल असंही मनोहरलाल खट्टर यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी बसचा कंडक्टर अशोक याला अटक केली आहे. मात्र शवविच्छेदनातून आलेल्या नव्या माहितीमुळे नवे प्रश्न उभे राहिले आहेत.