पंचकुला, दि. 25 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांच्या विरोधातील खटल्याचे सीबीआय न्यायालयात निकाल वाचन सुरु झाल्यानंतर हरयाणातील काही शहरांमध्ये वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. निकाल ऐकून राम रहीम यांच्या अनुयायांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
साध्वीवरील बलात्कार प्रकरणात पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने राम रहीम यांना दोषी ठरवले असून याप्रकरणी येत्या 28 ऑगस्टला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हरयाणात डेरा सच्चा सौदाचे समर्थक मोठया प्रमाणावर आहेत.
पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकालानंतर बाबा राम रहीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अंबाला येथील तुरूंगात त्यांची रवानगी होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये बाबाचे लाखो समर्थक जमा झाले आहेत. निकालानंतर हिंसाचार उसळण्याची शक्यता असल्याने हरियाणा आणि पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
हरियाणाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पंजाब आणि हरियाणा राज्यांतील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने 50 पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे.
राम रहीमबाबतच्या निकालाच्या पार्श्वभुमिवर हरियाणा सरकारने कलम 144 लावलं असून राज्यातील शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय 24 आणि 25 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर केली होती.पंचकुला जिल्ह्यात सध्या दोन हजारांहून जास्त जवान सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. जिल्ह्याला छावणीचं स्वरुप आलं आहे.
बाबा राम रहीमची 'सीक्रेट' गुफा, येथेच बलात्कार केल्याचा आहे आरोप
जवळपास 100 एकर परिसरात पसरलेल्या गुरमीत राम रहीम यांच्या आश्रमाच्या मधोमध काचेचं एक भवन आहे, त्याला बाबाची गुफा असं म्हटलं जातं. गुफेमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन-तीन दरवाजे आहेत. बाबाची गाडी थेट या दरवाजांपर्यंत पोहोचते. गुफेत प्रवेश करताना बायोमेट्रिक सिस्टिमचा वापर केला जातो. गुफेच्या रस्त्यात बंदुक घेऊन काही लोक तैनात असतात. बाबाच्या हजारो महिला भाविकांपैकी काही खास भाविकांनाच या गुफेत प्रवेश करण्याचा अधिकार आहे.
या महिला भाविक साध्वीसारख्या वेशभूषेत असतात. बाबाला जेवण भरवण्यापासून सकाळ-संध्याकाळ स्टेजवर नेण्या-आणण्याचं काम या महिला भाविक करतात. बाबाच्या प्रवचनाच्या वेळीही या महिला भाविकांना बसण्याची विशेष सोय असते. प्रवचन हॉलमधील सर्व व्यवस्था या महिला भाविकच सांभाळतात तर हॉलच्या बाहेरील भागात पुरूष कारसेवक काम करतात.
बाबाच्या या गुफेत विशेष व्यक्तींची भेट घेण्यासाठी एक रूम आहे. अनेक देशांमध्ये थेट बोलता यावं यासाठी याच रूममध्ये हॉटलाइन उपलब्ध आहे. या गुफेत ऐशोआरामाची प्रत्येक वस्तू आहे. बाबाच्या आश्रमात सीसीटीव्ही तर आहेच शिवाय एक कंट्रोल रूम आहे. या रूममध्ये देशातील सर्व चॅनलची मॉनेटरिंग आणि बाबाशी संबंधित बातम्या रेकॉर्ड करण्याची सिस्टीमही आहे.