नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे तिसरे वरिष्ठ न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी बुधवारी उशीरा रात्री बदलीची सूचना मिळाल्यानंतर गुरुवारी एका प्रकरणाचा निर्णय दिला. त्यानंतर ते म्हणाले दिल्ली उच्च न्यायालयातील हा माझा शेवटचा निर्णय आहे.
न्यायमूर्ती मुरलीधर यांनी बुधवारी दिल्लीतील हिंसा प्रकरणाची सुनावणी घेतली होती. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांना चांगलेच फटकारले होते. त्यानंतर उशीरा रात्री त्यांची बदली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात करण्यात आली. त्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
न्यायालय गुरुवारी बंद होताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयानंतर दिल्ली सरकारचे अतिरिक्त स्टँडींग कौन्सिल गौतम नारायण यांनी न्यायमूर्ती मुरलीधर यांच्यासोबत काम करणे आपला सन्मान असल्याचे म्हटले. मात्र श्रीमंत भागात व्यावसायिक घडामोडींसंदर्भातील मुरलीधर आणि न्यायमूर्ती व्ही.के. राव यांच्या खंडपीठाचा निर्णय अद्याप अधिकृतपणे अपलोड झालेला नाही.
दिल्ली हिंसाचार सुनावणीवेळी हायकोर्टाने दिल्लीत पुन्हा १९८४ ची पुनरावृत्ती होऊ देऊ नका असं सांगत दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते. आम्ही आताही १९८४ च्या दंगलीतील पीडितांच्या नुकसान भरपाईच्या प्रकरणांवर सुनावणी करत आहोत. अशाप्रकारे पुन्हा होऊ देऊ नका असं सांगितले. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा व अभय वर्मा या भाजप नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल गुन्हे नोंदवण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी विवेकाने निर्णय घ्यावा, असे निर्देशही हायकोर्टाने दिले होते.