मोदींच्या त्या 'प्लेन' ट्विटनंतर डॉ. मनमोहनसिंगांचाही फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:17 AM2021-09-23T11:17:48+5:302021-09-23T11:20:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन अमेरिकेच्या प्रवासाला निघालेला विमानातील फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शन देताना, मोदींनी विमानप्रवासात पेपरवर्क सुरू असल्याचे म्हटले.
नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी आज पहाटे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी विमानतळावर पोहोचले. मोदींचा तीन दिवसीय अमेरिका दौरा असून राजधानी दिल्लीतून ते बुधवारीच अमेरिकेसाटी रवाना झाले होते. सध्या अफगाणिस्तानातील रणकंदन पाहता मोदींचं विमान अफगानमार्गे न जाता पाकिस्तानमार्गे अमेरिकेला पोहोचले. त्यामुळे, मोदींना अमेरिकेला पोहोचण्यासाठी विलंब लागला असून अधिक काळ ते विमानप्रवासातच होते. या वेळेचाही मोदींनी सदुपयोग केल्याचं ट्विट सध्या व्हायरल होत आहे.
पंतप्रधाननरेंद्र मोदींनी ट्विट करुन अमेरिकेच्या प्रवासाला निघालेला विमानातील फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शन देताना, मोदींनी विमानप्रवासात पेपरवर्क सुरू असल्याचे म्हटले. तसेच, जास्त वेळेचा प्रवास म्हणजे पेपरवर्क आणि महत्त्वाच्या फाईल्स तपासण्याची संधी असते, असेही ते म्हणाले. मोदींचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोसोबत अनेकांनी मोदींच्या कार्यतत्परतेचं कौतुक केलंय. तर, मोदीभक्तांनीही हा फोटो शेअर करत, वेळचा सदुपयोग कसा करावा हे मोदींकडून शिकण्याचं आवाहन केलंय. मात्र, या फोटोनंतर आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचाही जुना फोटो व्हायरल होत आहे.
A long flight also means opportunities to go through papers and some file work. pic.twitter.com/nYoSjO6gIB
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2021
मोदींच्या ट्विटवरच अनेकांनी कमेंट करुन डॉ. मनमोहनसिंग यांचाही विमानातील एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, डॉ. मनमोहनसिंग हेही विमान प्रवासात पेपरवर्क आणि फाईलींचं कामकाज करताना दिसत आहेत. मनमोहनसिंग यांच्यासह अनेक माजी पंतप्रधानांचे विमानातील फोटो शेअर करण्यात आल्याचे दिसते. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी हेही विमान प्रवासात कामकाज करताना या फोटोत दिसत आहेत. त्यामुळे, मोदींना फक्त प्रत्येक गोष्टीची पब्लिसीटी करण्याची सवय आहे. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी ते केलं नाही, असे अनेकजण म्हणत आहेत.
15.3 तासांचा प्रवास
नवी दिल्ली ते वॉशिंग्टन हा प्रवास 15.30 तासांचा असतो. पंतप्रधान मोदींचं विमान कोणत्याही थांब्याशिवाय वॉशिंग्टनमध्ये दाखल झालं. त्यामुळे त्यांचे विमान कमी वेळेत पोहोचले पाहिजे होते. पण, मोदींचे विमान थेट अफगाणिस्तानमार्गे न जाता पाकिस्तानमार्गे जात असल्याने त्यांना थोडा जास्त वेळ लागला.