मोदींनंतर गडकरींनाही कळले नेहरुंचे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 05:23 AM2021-08-21T05:23:01+5:302021-08-21T05:23:20+5:30
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पं. नेहरू आणि अटलबिहारी हे भारताच्या लोकशाहीचे आदर्श नेता होते, असे सांगितले.
- विकास झाडे
नवी दिल्ली : स्वातंत्र्यादिनी पं. नेहरुंचे देश स्मरण करतो असे वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशालाच आश्चर्याचा धक्का दिला. लगेच तीन दिवसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेहरुंबद्दल तीन वेळा गौरवोद्वार काढले, त्यामुळे भाजपच्या मानसिकतेत परिवर्तन झाले की उत्तर प्रदेश निवडणुका समोर ठेवून टाकलेले फासे आहेत यावर राजधानी दिल्लीत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
चुकीच्या गोष्टीला पंडित नेहरुंना जबाबदार धरून आपली प्रतिमा उजळ दाखविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे मोदी यांना स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा पं. नेहरुंचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आठवले, तर दोन दिवसांपूर्वी न्यूज नेशनच्या कार्यक्रमात राजकारणावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पं. नेहरू आणि अटलबिहारी हे भारताच्या लोकशाहीचे आदर्श नेता होते, असे सांगितले.
लोकमताविरोधात जाऊ शकत नाहीत - अशोक चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पं. नेहरुंबाबत गौरवोद्गार काढलेत हे बदल स्वागतार्ह आहे. शेवटी नेहरू-गांधी कुटुंबीयांबाबत जे लोकमत आहे, त्याविरोधात किती दिवस हे नेते तग धरू शकले असते. गांधी आणि नेहरुंच्या विचाराला पर्याय नाही हे मोदी, गडकरींना कळून चुकले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.