माल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 12:47 PM2018-09-24T12:47:03+5:302018-09-24T12:47:26+5:30
बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परागंदा झालेल्यांच्या यादीत नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय माल्यानंतर आता आणखी एका उद्योगपतीचा समावेश झाला आहे.
नवी दिल्ली- बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परागंदा झालेल्यांच्या यादीत नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय माल्यानंतर आता आणखी एका उद्योगपतीचा समावेश झाला आहे. गुजरातमधला व्यावसायिक नितीन संदेसरा हा बँकांमध्ये 5 हजार कोटींचा घोटाळा करून नायजेरियात पळून गेला. स्टर्लिंग बायोटेकचा सर्वेसर्वा नितीन संदेसरा याच्यावर 5 हजार कोटी रुपयांचा बँक घोटाळा केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो दुबईत असल्याची माहिती मिळाली होती. परंतु तो आता नायजेरियात फरार झाला आहे, अशी माहिती ईडी आणि सीबीआयच्या सूत्रांकडून समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ईडी आणि सीबीआयच्या सूत्रांना नितीन, त्याचा भाऊ चेतन संदेसरा, वहिणी दीप्ती बेन संदेसरा आणि कुटुंबीयांतील इतर सदस्य नायजेरियात असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु त्याची अजून खातरजमा झालेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी नितीनला दुबईत यूएई पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. कालांतरानं ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं. त्यानंतर नितीन संदेसरा आणि त्याचे कुटुंबीय नाजयेरियात परागंदा झाले. भारताचा नायजेरियाबरोबर कोणताही प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे त्याला नायजेरियातून भारतात परत आणणं अवघड आहे.
तपास यंत्रणांनी यूएई प्रशासनाला संदेसराच्या अटकेचा अर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून संदेसरा कुटुंबीयांना रेड कॉर्नर नोटीसही बजावता येईल. नितीन संदेसरा यानं औषधं विकण्यापासून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं ऑइल, रिएल एस्टेटसह अन्य व्यवसाय सुरू केले. संदेसरा याचा व्यवसाय भारताशिवाय नायजेरिया, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, अमेरिका, सेशल्स आणि मॉरिशसपर्यंत पसरला आहे. नायजेरियात त्याच्या तेलाच्या खाणी असल्याचीही चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीनं स्टर्लिंग बायोटेकच्या दिल्ली, मुंबई, बडोदा, अहमदाबाद आणि सूरतसह देशातल्या विविध शहरांमधल्या 50 ठिकाणी छापेमारी केली आहे.