ओडिशामध्ये भाजपासोबत युती तुटल्यानंतर एनडीएला आणखी एका राज्यात धक्का बसला आहे. पंजाबमध्ये अकाली दल सोबत चर्चा फिस्कटल्याने भाजपा एकट्याने लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस देखील वेगवेगळे लढणार आहेत. यामुळे अकाली दल आणि भाजपामध्ये जागावाटपावरून बोलणी सुरु होती. अकाली दलाने २०१९-२० मध्येच भाजपाची साथ सोडली होती. परंतु पुन्हा काही वर्षांनी हे पक्ष एकत्र आले होते. शिवसेनेनंतर भाजपाची साथ सोडणारा अकाली दल हा दुसरा मोठा पक्ष होता. आता पुन्हा या दोन्ही पक्षांत बिनसले आहे. शिरोमणी अकाली दलाने पंजाबमध्ये ९ जागा लढविण्याचा प्रस्ताव भाजपासमोर ठेवला होता. तर भाजपाला चार जागांची ऑफर दिली होती.
भाजपाचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी बोलणी फिस्कटल्याचे म्हटले आहे. ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत पंजाबच्या लोकांच्या भल्यासाठी भाजपाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये भाजपा एकट्याने निवडणूक लढविणार आहे. लोकांचे मत, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत, नेत्यांची मते जाणून घेऊन जवान, शेतकरी, व्यापारी आणि मजुरांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्या आहे, असे जाखड यांनी म्हटले आहे.
ओडिशामध्येही भाजपाने बीजदसोबत युती तोडली होती. २१ पैकी ११ जागांची ऑफर पटनायक यांच्या बिजु जनता दलाने भाजपाला दिली होती. परंतु भाजपाला यापेक्षा जास्त जागा हव्या होत्या. यामुळे भाजपाने ही युती तोडली होती. आता पंजाब दुसरे राज्य ठरले आहे. मोदींना ४०० खासदारांचा आकडा गाठायचा आहे, यासाठी भाजप स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहे.